आनंदाची बातमी : आजपासून एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSRTC) विद्यार्थ्यांच्या हितासाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही अभिनव मोहीम १६ जून २०२५ पासून राज्यभर राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना एसटी बसचे मासिक / सत्रिक पास थेट त्यांच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये वितरित केले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना एसटी आगारात जाऊन पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
योजनेचा उद्देश काय?
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी होणारा वेळ, खर्च आणि त्रास वाचवणे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुलभ व्हावी, त्यांच्या सुरक्षेची खात्री व्हावी, याकरता एसटी महामंडळाने ही योजना आखली आहे.
पास कसे वितरित केले जाणार?
- एसटी महामंडळाच्या सर्व आगार व्यवस्थापकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांशी संपर्क साधून मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्याशी पत्रव्यवहार करावा.
- त्यानुसार, विद्यार्थ्यांना एसटी पासची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांची यादी शाळा/महाविद्यालयांनी तयार ठेवावी.
- आगार व्यवस्थापक ही यादी घेऊन शाळांमध्ये जाऊन थेट त्या शाळांमध्येच पास वितरित करतील.
कोणाला होणार लाभ?
- राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे.
- विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, जिथे एसटी बस हे प्रमुख वाहतूक साधन आहे.
अधिकृत घोषणा
ही मोहीम महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यभरातील शैक्षणिक संस्था, एसटी विभाग व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधून ही योजना प्रभावीपणे अंमलात आणली जाणार आहे.
‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहीम म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे शिक्षणात सातत्य राहील, प्रवास सुलभ होईल आणि पालकांवरील आर्थिक भारही काही अंशी कमी होईल. हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरेल, हे निश्चित!